ईद ए मिलादुन्नबीनिमित्त मालेगावात भव्य रक्तदान शिबिर

जामा मशीद चौकात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग; रक्तदानातून माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडलं. स्थानिक जामा मशीद चौकात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्साहाने सहभागी होत रक्तदान केलं. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तरुणांनी पुढाकार घेत दिलेला हा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरला.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने जामा मशीद चौकात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं.
या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केलं. रक्तदात्यांनी सांगितलं की, आपल्या रक्ताचा उपयोग एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी झाला, यापेक्षा मोठं समाधान दुसरं काय असू शकतं.
या रक्तदान शिबिराला काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार साजिद खान पठाण यांनीही भेट दिली. त्यांनी रक्तदान करणाऱ्या तरुणांचं कौतुक करत, युवकांनी अशा सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं.
मालेगावचे ठाणेदार राजेश खेरडे यांनीही शिबिराला भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. त्यांनी रक्तदानाचं महत्त्व आणि त्याचे फायदे याबाबत तरुणांना माहिती दिली. तसंच सामाजिक कार्यात यापुढेही अशाच पद्धतीने योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अलमोमीन ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून तरुणांनी रक्तदानासोबतच माणुसकी, सेवा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला.
ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेलं हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी मिसाल ठरलं. तरुणांच्या मोठ्या सहभागातून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याचा आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. रक्तदानातून जपलेली ही माणुसकी निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.



