वर्ध्यातील विश्व हिंदी विद्यालयाच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या!

विद्यार्थ्यांच्या ताटातील भाजीमध्ये अळ्या आढळल्याने संताप; जेवणावर बहिष्कार, विद्यापीठ प्रशासनाची घटनास्थळी धाव
वर्धा | प्रतिनिधी — सतीश काळे
वर्ध्यातील आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यालयाच्या वसतिगृहातील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या प्लेटमध्ये वाढलेल्या भाजीमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
भाजीमध्ये अळ्या आढळल्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत जेवणावर बहिष्कार टाकला. या प्रकाराची माहिती वार्डन आणि मेस चालकाला देऊनही सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत प्रशासनाकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या विरोधाची माहिती मिळताच विद्यापीठ प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रकार गंभीर असल्याने प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी — सतीश काळे, वर्धा



