जिनिंग फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मरमधून दीड लाखांची कॉपर कॉईल चोरी

देवगावात ६३० केव्हीए ट्रान्सफॉर्मर चोरट्यांच्या निशाण्यावर; मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरी
धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर परिसरात चोरट्यांनी चक्क जिनिंग फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मरलाच लक्ष्य केलं आहे. देवगाव येथील जिनिंग फॅक्टरीच्या ६३० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधील तब्बल दीड लाख रुपये किमतीची कॉपर कॉईल अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या काळात ही चोरी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवगाव येथील जिनिंग फॅक्टरीमध्ये ही चोरीची घटना घडली आहे.
फिर्यादी राजेश अशोक चांडक यांच्या पत्नीच्या नावाने देवगाव येथे जिनिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या परिसरात ६३० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे.
१७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजल्यापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधत ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल काढून चोरून नेली.
या कॉपर कॉईलची अंदाजे किंमत तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये असल्याची माहिती आहे.
फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने तळेगाव दशासर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
यानंतर राजेश चांडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्रमांक २०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ट्रान्सफॉर्मरसारख्या अवजड यंत्रणेतून कॉपर कॉईल काढण्यासाठी चोरट्यांनी नेमकी कोणती पद्धत वापरली, या चोरीमध्ये किती जणांचा सहभाग होता आणि चोरी केलेली कॉपर कॉईल कुठे नेण्यात आली, याचा तपास आता तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे जिनिंग फॅक्टरी आणि परिसरातील औद्योगिक साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
जिनिंग फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मरमधून थेट दीड लाख रुपयांची कॉपर कॉईल चोरीला गेल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तळेगाव दशासर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या चोरीमागे नेमकं कोण आहे आणि पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न होतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.



