शेती खरेदीच्या नावाखाली सेवानिवृत्त शिक्षकाची ३० लाखांची फसवणूक!

बनावट पॅनकार्ड-आधारकार्डचा वापर करून जमीनमालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी केल्याचा आरोप; रामटेक पोलिसांत चौघांविरुद्ध तक्रार
रामटेकमध्ये शेती खरेदीच्या नावाखाली सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर करून जमीनमालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी रामटेक पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रामटेक तालुक्यातील मौजा खोपडी येथील सर्वे क्रमांक १६४ मधील १.२४ हेक्टर शेतीच्या व्यवहारातून ही फसवणूक झाल्याची तक्रार आहे.
तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेष्वर चुडामन बावनकर यांच्या माहितीनुसार, प्रकाश रघुनाथ गजभिये यांनी शेती विक्रीस असल्याचे सांगितले. ९ एप्रिल रोजी ७६ लाख ५७ हजार रुपयांत व्यवहार ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर बावनकर यांनी ५ लाख रुपये बयाणा दिला. पुढे रोख रक्कम आणि चेकच्या माध्यमातून तब्बल ३० लाख रुपये देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
मात्र, व्यवहारादरम्यान जमीनमालक म्हणून सादर करण्यात आलेली व्यक्ती मूळ मालक रत्नाकर मानिकराव अडकने नसल्याचे समोर आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
कामठी येथे मूळ जमीनमालकाची भेट घेतल्यानंतर त्यांनी जमीन विकली नसल्याचे आणि कोणतेही पैसे घेतले नसल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच त्यांच्या नावाने बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड तयार करून बनावट व्यक्तीला जमीनमालक म्हणून सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रकाश रघुनाथ गजभिये, प्रशांत शेषराव कुथे, अश्विन उके आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक व संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण भोयर अधिक तपास करीत आहेत.
शेती खरेदीच्या व्यवहारात ३० लाख रुपये दिल्यानंतर बनावट जमीनमालकाचा प्रकार समोर आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतर या संपूर्ण प्रकरणातील नेमके सत्य समोर येणार आहे.



