AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

रिंग रोडचे काम अपूर्ण, तरी चमन नगरमधील घरांवर बुलडोझर; नागरिकांचा संताप

रस्ता आणि पूल पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार असताना कारवाईची घाई का? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

अमरावती | बडनेरा प्रतिनिधी

बडनेऱ्यात प्रस्तावित रिंग रोडच्या कामावरून आता नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बडनेरा जुनी वस्तीतील चमन नगर परिसरातील घरांवर प्रशासनाने कारवाई करत बांधकामे हटवली आहेत. मात्र रिंग रोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना राहती घरे पाडण्यात आल्याने नागरिकांनी कारवाईच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चमन नगरमध्ये प्रशासनाची कारवाई

लालखडी ते बडनेरा प्रस्तावित रिंग रोडच्या मार्गातील अतिक्रमित बांधकामांवर प्रशासनाने धडक कारवाई केली. अवजड यंत्रसामग्रीला कामासाठी जागा उपलब्ध व्हावी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र या कारवाईमुळे चमन नगरमधील काही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रिंग रोडचे काम अद्याप अपूर्ण

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित रिंग रोडचे प्रत्यक्ष काम अद्याप पन्नास टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यातच पुढील रेल्वे टर्निंग ब्रिजचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी चर्चा आहे.

जर रस्ता आणि पूल पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार असेल, तर रहिवाशांची घरे आत्ताच पाडण्याची एवढी घाई का करण्यात आली? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विकासकामांना विरोध नाही, मात्र नियोजनाची मागणी

रिंग रोडसारख्या विकासकामांना नागरिकांचा विरोध नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र कारवाई करताना नागरिकांचे पुनर्वसन, पर्यायी व्यवस्था आणि प्रकल्पाच्या कामाचे नियोजन यांचा विचार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बेघर झालेल्या नागरिकांचे काय?

रिंग रोड पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, तोपर्यंत कारवाईमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची व्यवस्था काय असणार आणि घरांवरील कारवाई नेमकी कोणत्या नियोजनानुसार करण्यात आली, हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

विकासकामे आवश्यक असली तरी नागरिकांचे नुकसान होणार नाही, अशा नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई होणे गरजेचे आहे. चमन नगरमधील बुलडोझर कारवाईनंतर आता प्रशासन या प्रश्नांवर काय स्पष्टीकरण देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button