समृद्धी महामार्गावर संत गजानन महाराजांच्या पालखीचे मनोहारी दृश्य

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात ५७ वा पालखी सोहळा उत्साहात; भक्ती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात संत श्री गजानन महाराजांच्या ५७ व्या पालखी सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी मेहकर येथून संत गजानन महाराजांची पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी समृद्धी महामार्गावरील पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या पालखीचे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले.
मेहकरमध्ये पालखीचे भव्य स्वागत
पालखीचे मेहकर नगरीत आगमन होताच शहराच्या वेशीवर फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. जेसीबीच्या सहाय्याने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पारंपरिक वेशभूषेतील वारकरी टाळ आणि मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी
संत गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘गण गण गणात बोते’ आणि ‘श्री गजानन महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
५७ व्या पालखी सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावर भक्ती आणि आधुनिकतेचा संगम
मेहकरहून शेगावच्या दिशेने पालखीचा पुढील प्रवास सुरू असताना समृद्धी महामार्गावरील पुलावरून पालखी मार्गस्थ होत असल्याचे दृश्य विशेष आकर्षण ठरले.
एका बाजूला आधुनिकतेचे प्रतीक असलेला समृद्धी महामार्ग, तर दुसऱ्या बाजूला भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेने भारलेला पालखी सोहळा, असा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला.
समृद्धी महामार्गाच्या पुलावरून पालखी जात असतानाचे हे मनोहारी दृश्य भाविकांसह नागरिकांचेही लक्ष वेधून घेत होते.
भक्तिमय वातावरणात शेगावकडे प्रस्थान
‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात संत श्री गजानन महाराजांची पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बुलढाण्यातून सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांच्यासह.



