मित्राला गाडी दाखवण्याच्या बहाण्याने झायलो घेऊन फरार; विक्री केल्याचा संशय

इमामवाडा पोलिसांकडून विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपुरात विश्वासाचा गैरफायदा घेत जुनी महिंद्रा झायलो गाडी घेऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. मित्राला गाडी दाखवायची असल्याचे सांगून आरोपीने वाहन ताब्यात घेतले आणि ते परत न करता दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आरोपी जितेंद्र निपाने (वय ३६) हा वाहन पाहण्यासाठी आला होता.
चर्चेदरम्यान आरोपीने आपल्या मित्राला महिंद्रा झायलो गाडी खरेदी करायची असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने विक्रीसाठी ठेवलेली गाडी विश्वासाने मित्राला दाखवून तात्काळ परत आणण्याच्या अटीवर आरोपीच्या ताब्यात दिली.
मात्र, गाडी घेऊन गेल्यानंतर आरोपी परत आला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करूनही तो उपलब्ध झाला नसल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर फिर्यादीला संबंधित वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा संशय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जितेंद्र निपाने याच्याविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संबंधित महिंद्रा झायलो नेमकी कुठे विकण्यात आली, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि वाहनाचा सध्याचा ठावठिकाणा काय आहे, याचा सखोल तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत.



