citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

फुलउमरी पाझर तलावात बुडून 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या अंश जयस्वालचा जीव गेला; पुसद शहरात शोककळा

पुसद प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पुसद शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथील अतिथी हॉटेलचे संचालक विजय जयस्वाल यांचा मुलगा अंश जयस्वाल हा काही मित्रांसह फुलउमरी येथील पाझर तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर अंश आणि त्याचे काही मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले.

पोहत असताना अंश खोल पाण्यात गेला. त्याला पोहण्याचे पुरेसे कौशल्य नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच अंश पाण्याखाली गेला आणि बेपत्ता झाला.

घटनेची माहिती मिळताच मानोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून तलाव परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. बराच वेळ शोध घेऊनही अंशचा शोध लागला नाही. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाची मदत घेण्यात आली.

एनडीआरएफच्या पथकाने तलावात सखोल शोधमोहीम राबवली. अखेर दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास अथक प्रयत्नांनंतर अंश जयस्वाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

पुसदमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक विजय जयस्वाल यांच्या एकुलत्या एक मुलाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण शहराला चटका लावून गेला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर तलाव, नदी आणि धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button