citynewsIndia NewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMumbaipolitics

मोदींनी देशाचा चेहरामोहरा बदलला; 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेत मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले. देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून आज जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यकाळात तब्बल 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार देशातील 22 राज्यांमध्ये कार्यरत असून जनतेचा विश्वास मोदींच्या नेतृत्वावर असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे 7.71 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भारत आज जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला असून कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचा दावा त्यांनी केला.

जनधन योजनेअंतर्गत कोट्यवधी बँक खाती उघडण्यात आली असून आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळाली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सध्या देशभरात 3 कोटी घरे बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, देशातील 3 कोटी महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. आगामी काळात आणखी 6 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे. भारताच्या नेतृत्वाकडे अनेक देश आशेने पाहत असून विविध विकास प्रकल्पांमध्ये भारताचे मार्गदर्शन घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशातील प्रशासन अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी सरकारी योजनांचे डिजिटल मॉनिटरिंग सुरू करण्यात आले आहे. सैन्यात महिलांचा सहभाग वाढवत त्यांच्या संख्येला 11 हजारांहून अधिक करण्यात आले आहे. गेल्या 12 वर्षांत सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाची मजबूत पायाभरणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

आरोग्य क्षेत्रात देशभरात 13 नवीन एम्स रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. तर देशातील 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जगातील सर्वाधिक विकासदर असलेला देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. जीएसटी संकलन 22 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून यूपीआय आणि डिजिटल माध्यमातून 314 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार होत आहेत.

भारताने विकसित केलेली यूपीआय प्रणाली आज जगातील 30 देशांमध्ये वापरली जात आहे. स्टार्टअप क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली असून देशात 2.6 लाखांहून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उल्लेख करताना फडणवीस यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. तसेच काश्मीरमधील ऐतिहासिक चूक सुधारण्याचे काम मोदी सरकारने केले असून डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकल्याचा दावा त्यांनी केला.

मोदी सरकारवर गेल्या 12 वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काँग्रेस पक्षावर टीका करताना त्यांनी “काँग्रेस हे बुडते जहाज आहे, बुडत्या बोटीत कोणीही पाय ठेवत नाही,” अशी टीका केली.

महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य बनेल. विशेष सिंचन पॅकेजअंतर्गत राज्यातील 100 हून अधिक सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शासनाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी. योग्य नियोजन केल्यास दुबार पेरणीची वेळ येणार नाही. तसेच राज्यभरात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण केली जात असून पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, डिजिटल क्रांती, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button