citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये काँग्रेसचा संताप उसळला! उमेदवारी माघारीनंतर साहेबराव कांबळेंविरोधात आंदोलन; रस्त्यावर पैसे उधळत निषेध

यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले असून आज यवतमाळ शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महायुती सरकार आणि साहेबराव कांबळे यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर पैसे उधळत निवडणुकीत पैशांचा घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. महायुती सरकारने आर्थिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेप करून काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान निषेधाचे फलक झळकविण्यात आले होते. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी साहेबराव कांबळे यांच्या छायाचित्राला चपला मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. परिसरात “सात खोके, एकदम ओके” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी माघारीचा निर्णय हा पक्षाच्या विचारसरणीशी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनीही आंदोलनात सहभागी होत साहेबराव कांबळे यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करत त्यांनी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास डावलण्यात आल्याचे म्हटले. तसेच या प्रकरणामागील सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. उमेदवारी माघारीच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पक्षात निर्माण झालेली नाराजी आता उघडपणे समोर येत असून त्याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यवतमाळमधील या आंदोलनामुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून आगामी काळात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button