‘विषारी दारू प्रकरणानंतर पोलिसांचा मोठा अॅक्शन मोड! गौरखेड्यात 84 हजार लिटर मोहाचा सडवा नष्ट; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त’

अमरावती : पिंपरी-चिंचवड येथे कथित विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अवैध दारू निर्मितीविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांच्या धडक कारवायांनंतर आता ग्रामीण पोलिसांनीही अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी गौरखेडा येथील पारधी बेड्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 84 हजार लिटर मोहाचा सडवा नष्ट करत जवळपास 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गौरखेडा गावातील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईची योजना आखली.
पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि लोखंडी ड्रममध्ये साठवून ठेवलेला मोहाचा सडवा आढळून आला. अवैध दारू निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि तयारी पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
कारवाईदरम्यान प्रत्येकी 200 लिटर क्षमतेचे 32 प्लास्टिक ड्रम तसेच 10 लोखंडी ड्रममध्ये साठवलेला एकूण 84 हजार लिटर मोहाचा सडवा जप्त करण्यात आला. आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकणारा हा सडवा पोलिसांनी जागीच नष्ट केला. पोलिसांच्या माहितीनुसार या सडव्याची अंदाजे किंमत 8 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.
याशिवाय दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे नवसागर, गूळ, लोखंडी पिपे, मोठ्या कढया, टोपल्या, पाइप आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले. या संपूर्ण कारवाईत जप्त आणि नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 9 लाख 88 हजार 800 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी गौरखेडा येथील गिरीश सुभाष पवार (वय 42) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा या अवैध व्यवसायाशी नेमका किती काळ संबंध होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अजय आकरे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवत मोठ्या प्रमाणातील अवैध दारू निर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील जीवघेण्या दारू प्रकरणानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे. तब्बल 84 हजार लिटर मोहाचा सडवा नष्ट करून संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यात पोलिसांना यश आल्याची चर्चा आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे आता नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.



