‘राज्यमंत्री पदाचे आमिष, 20.50 कोटींची मागणी; यवतमाळमध्ये फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, तिघे जेरबंद’

यवतमाळ : केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कथित फसवणूक रॅकेटचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय नियुक्त्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधत त्यांना केंद्रीय स्तरावरील राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या बदल्यात आरोपींनी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर व्यवहाराची सुरुवात करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
आरोपींनी स्वतःचे दिल्लीतील उच्चस्तरीय राजकीय आणि प्रशासकीय संपर्क असल्याचा दावा करत विविध महामंडळे, समित्या आणि नियुक्त्यांशी संबंधित कथित यादी तसेच काही कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मोठ्या आर्थिक व्यवहाराची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र आरोपींच्या बोलण्यातील विसंगती आणि त्यांच्या दाव्यांबाबत नितीन भुतडा यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी अत्यंत सावध पाऊल उचलले. माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वायफाय मेटल क्लॉक बसवून आरोपींसोबत झालेल्या चर्चेचे गुप्त रेकॉर्डिंग करण्यात आले. या रेकॉर्डिंगमध्ये आर्थिक व्यवहार, पद मिळवून देण्याची आश्वासने आणि कथित संपर्कांबाबतची माहिती समोर आल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड या तिघांना अटक केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपींची चौकशी सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. आरोपींचे इतर कोणाशी संबंध होते का, अशा प्रकारे आणखी किती लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्ती सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे. तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यमंत्री पदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याच्या या प्रकरणामुळे यवतमाळसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या रॅकेटमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



