‘डिझेलसाठी बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून 5 किमी प्रवास! बुलढाण्यातील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन, प्रशासनाविरोधात संताप’

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या अडचणी किती टोकाला पोहोचल्या आहेत, याचे एक धक्कादायक आणि तितकेच वेदनादायी चित्र बुलढाणा जिल्ह्यात समोर आले आहे. डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर थेट बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपापर्यंत नेल्याची घटना मेहकर तालुक्यात घडली आहे. या अनोख्या आंदोलनाने केवळ स्थानिकांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून डिझेल टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरातील आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्याची गरज होती. मात्र पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने आणि परिसरात डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. शेतीची कामे तातडीची असताना ट्रॅक्टरसाठी इंधन मिळत नसल्यामुळे ते हवालदिल झाले.
अखेर या समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला. विनायकराव टाले यांनी आपला ट्रॅक्टर बैलगाडीला बांधला आणि बैलांच्या मदतीने जवळपास पाच किलोमीटर अंतर पार करत डोणगाव येथील पेट्रोल पंप गाठला. रस्त्यावरून बैलगाडीला बांधलेला ट्रॅक्टर जात असल्याचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
या अनोख्या आंदोलनामुळे डिझेल टंचाईचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांच्या मते, सध्या जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीची शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. पेरणीचा हंगाम अगदी तोंडावर आला असताना ट्रॅक्टर आणि शेती यंत्रसामग्रीसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टर शेतातच उभे राहिल्याचे चित्र दिसत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी सांगतात की, कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसते. त्यामुळे शेतीची महत्त्वाची कामे रखडत असून उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडून परिस्थिती सुधारण्याची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये डिझेल उपलब्धतेचा प्रश्न कायम असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेती हाच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असताना इंधन टंचाईमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
डिझेलचा नियमित आणि पुरेसा पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विनायकराव टाले यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता परिसरातून जोर धरत आहे.
बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठण्याची वेळ एका शेतकऱ्यावर येणे ही केवळ एक घटना नसून ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीचे बोलके चित्र आहे. शेतीचा हंगाम तोंडावर असताना इंधन टंचाईचा प्रश्न मार्गी लावणे ही प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी, अशी भावना आता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



