AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सिटी न्यूजच्या पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासन जागे; मसानगंजमध्ये पहाटेपासून स्वच्छता मोहीम सुरू

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मोरबाग विलासनगर परिसरातील मसानगंज भागात गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्यांची सफाई, सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम रखडले होते. वाढत्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. संतप्त नागरिकांनी रविवारी रात्री सिटी न्यूजशी संपर्क साधत आपली व्यथा मांडली. सिटी न्यूजची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि सिटी न्यूजच्या उपस्थितीनंतर मनपा प्रशासन जागे झाले. त्यानंतर अवघ्या काही तासांत मनपा प्रशासन आणि स्वच्छता विभाग खडबडून जागा झाला. पहाटेपासून जेट मशीन, सफाई कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक ६ मधील मोरबाग विलासनगर अंतर्गत येणारा मसानगंज परिसर अनेक महिन्यांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला होता.

परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली होती. मोठे नाले कचऱ्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला होता.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर रविवारी रात्री संतप्त नागरिकांनी सिटी न्यूजशी संपर्क साधत परिसरातील गंभीर परिस्थिती मांडली.

सिटी न्यूजची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांनी प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त करत समस्यांची माहिती दिली. परिसरातील अस्वच्छतेची वस्तुस्थिती कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. रस्त्यावर नाल्याचे सांडपाणी वाहत असल्याचेही दिसून आले.

सिटी न्यूजच्या उपस्थितीचा परिणाम मनपा प्रशासनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळ होताच महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग सक्रिय झाला. जेट मशीन, ट्रॅक्टर, सफाई साहित्य आणि मोठ्या संख्येने कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली. कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. रात्रीचे अस्वच्छ दृश्य आणि सकाळच्या स्वच्छता मोहिमेतील बदल नागरिकांना स्पष्टपणे पाहायला मिळाला.

विशेष म्हणजे सकाळी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेची माहिती मिळताच परिसरातील चारही नगरसेवक घटनास्थळी पोहोचले आणि कामांची पाहणी केली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिलेल्या समस्यांकडे सिटी न्यूजने लक्ष वेधल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे झाले.

प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवून नियमितपणे अशाच पद्धतीने काम केल्यास शहरातील वाढती घाण, साचलेला कचरा आणि अस्वच्छतेच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या समस्या प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल सिटी न्यूजचे आभार मानले.

मसानगंज परिसरातील नागरिकांच्या समस्यांना आवाज देत सिटी न्यूजच्या उपस्थितीनंतर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र ही मोहीम केवळ एकदिवसीय न राहता नियमित स्वरूपात राबविली गेली तरच परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळू शकतो. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सिटी न्यूजचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button