AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावतीत पोलिसांचे धडक “नाकाबंदी ऑपरेशन”; वाहनचालकांची कसून तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

अमरावती शहरात वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी, वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात “नाकाबंदी ऑपरेशन” राबवले. शहरातील प्रमुख चौकांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहनांचे कागदपत्र, डिक्की, चालकांची तपासणी, मद्यप्राशन चाचणी अशा विविध माध्यमातून पोलिसांनी सखोल तपासणी केली. या धडक मोहिमेमुळे नियम तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक वाहनचालकांनी पोलिस तपासणी टाळण्यासाठी मार्गच बदलल्याचे चित्र दिसून आले. पाहूया हा विशेष रिपोर्ट…

अमरावती शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरभर एकाचवेळी व्यापक नाकाबंदी मोहीम राबवत वाहनधारकांची कसून तपासणी केली. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये तपासणी नाके उभारण्यात आले होते.

वाहनांचे परवाने, आरसी बुक, विमा कागदपत्रे, प्रदूषण प्रमाणपत्र यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत नाहीत ना, याचीही विशेष पडताळणी करण्यात आली. संशयित वाहनांच्या डिक्क्यांची तपासणी करून कोणतीही अनधिकृत अथवा बेकायदेशीर सामग्री वाहून नेली जात नाही ना, यावर पोलिसांनी बारकाईने लक्ष केंद्रित केले.

शहरातील राजकमल चौकात विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती. येथे दोन डझनहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके स्वतः संपूर्ण पथकासह उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व करत होते.

राजापेठ परिसरासह शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्येही पोलिसांची कडक तपासणी सुरू होती. तपासणीची माहिती मिळताच अनेक वाहनचालकांनी चौक गाठण्यापूर्वीच आपले मार्ग बदलल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस कारवाईची दहशत नियमभंग करणाऱ्यांमध्ये स्पष्टपणे जाणवत होती.

मात्र, एवढ्या मोठ्या नाकाबंदी मोहिमेनंतरही काही दुचाकीस्वार ट्रिपल सीट प्रवास करताना आढळले. जणू पोलिसांचा धाकच उरलेला नाही, अशा प्रकारे काही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र समोर आले. पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत अनेकांना जागेवरच चलन बजावले.

पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवणे, कालबाह्य आणि अयोग्य वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखणे, स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि वाहनचालकांमध्ये आवश्यक कागदपत्रे कायम सोबत ठेवण्याची सवय निर्माण करणे हा होता.

पोलिसांच्या मते, नियमित नाकाबंदी आणि तपासणीमुळे वाहनांवरून गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोठा अंकुश बसतो. संशयित व्यक्ती आणि वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अशा मोहिमा महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

अमरावती शहरात राबविण्यात आलेले हे “नाकाबंदी ऑपरेशन” आता चर्चेचा विषय बनले असून वाहनांच्या माध्यमातून गुन्हे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पोलिसांनी मोठा घाव घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाहतूक नियमांचे पालन, आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षित वाहनचालक हीच सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली आहे. अमरावती पोलिसांच्या या धडक नाकाबंदी मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. अशाच प्रकारच्या नियमित कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button