AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत संस्कार, संस्कृती आणि अध्यात्माचा अनोखा संगम; सुसंस्कार बाल संस्कार शिबिरातून भव्य दिंडी सोहळा

अमरावती शहरात आज भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुसंस्कार बाल संस्कार शिबिराच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचा वारसा जपत लहान मुलांपासून युवक-युवतींपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरातील प्रमुख मार्ग भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले.

गेल्या २०१४ वर्षांपासून अखंड सुरू असलेले हे सुसंस्कार बाल संस्कार शिबिर यंदाही १ मेपासून सुरू झाले असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या शिबिरातून केले जात आहे. शिबिराच्या विसाव्या दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

पंचवटी चौकातून सुरू झालेल्या या दिंडीमध्ये टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका आणि वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी भक्तीमय वातावरण निर्माण केले. पंचवटी चौक, इरविन चौक, जयस्तंभ चौक मार्गे ही दिंडी राजकमल चौकापर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी दिंडीचे स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेतील अवल्या, भारूड आणि भगवद्गीतेचे पठण यांसारख्या सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे भारतीय अध्यात्मिक परंपरेची झलक सादर केली. तसेच लाठी-काठी, तलवारबाजी आणि स्वसंरक्षणाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. युवक-युवतींसह लहान मुलांनी आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कार यांचे दर्शन घडवत उपस्थितांची दाद मिळवली.

राजकमल चौकात झालेल्या विशेष सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने उपस्थित नागरिकांवर विशेष प्रभाव पाडला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आजच्या पिढीसाठी अशा संस्कार शिबिरांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

ट्रस्टचे प्रतिनिधी आदित्य महाराज रोडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केवळ अध्यात्म नव्हे तर नैतिक मूल्ये, पारिवारिक संस्कार, समाजसेवा आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व शिकवले जाते. आधुनिक युगात वाढत्या सामाजिक आणि नैतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला सकारात्मक दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

संस्कार, शिस्त, अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवणाऱ्या या सुसंस्कार बाल संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची जडणघडण होत असल्याचे चित्र दिसून आले. दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती आणि अध्यात्माचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

भारतीय संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजात संस्कारांची बीजे रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे या दिंडी सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button