अमरावतीत हृदयद्रावक घटना! शेताजवळ दफन केलेल्या नवजाताचा मृतदेह बाहेर काढणार; पोस्टमार्टममधून उलगडणार मृत्यूचं गूढ

अमरावतीच्या बडनेरा पोलीस ठाणे हद्दीतून एक अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कालीमाता नगर परिसरात शेताजवळ जमिनीत दफन करण्यात आलेल्या नवजात बालकाचा मृतदेह आता दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. तीव्र उष्णता, आजारपण आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
कालीमाता नगर परिसरात खळबळ
बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोतदार स्कूलच्या मागील भागात रविवारी संध्याकाळी अचानक खळबळ उडाली. शेताजवळ एका नवजात बालकाला दफन करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
प्राथमिक माहितीनुसार, भटक्या समाजातील एका महिलेने तीन दिवसांपूर्वी मोकळ्या मैदानात प्रसूती केली होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हे कुटुंब त्याच परिसरात तात्पुरत्या स्वरूपात राहत होते.
उपचाराअभावी मृत्यूची शक्यता
रविवारी अमरावतीत तापमानाने चाळिशी ओलांडली होती. प्रचंड उष्णता, नवजाताची नाजूक प्रकृती आणि योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे बालकाची प्रकृती अचानक खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आई आणि नातेवाईकांनी शेताजवळ खड्डा खोदून त्याचा मृतदेह दफन केला.
शेतकऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती
परिसरातील काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ बडनेरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान आईने संपूर्ण घटना सांगितल्याचे समजते.
आज होणार इन-कॅमेरा प्रक्रिया
रात्र जास्त झाल्याने रविवारी मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही. सोमवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा प्रक्रियेद्वारे मृतदेह बाहेर काढून इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
पोस्टमार्टम अहवालानंतर नवजाताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
या हृदयद्रावक घटनेमुळे गरीब आणि भटक्या कुटुंबांपर्यंत मूलभूत आरोग्य सेवा खरोखर पोहोचत आहेत का, हा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका नवजाताला वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित हा दुर्दैवी शेवट टाळता आला असता, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
बडनेरा पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय निष्कर्षांनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गरीबी, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि असुरक्षित जीवनशैली यांचा हा वेदनादायक परिणाम मानला जात आहे. एका नवजाताच्या मृत्यूने समाज आणि प्रशासन दोघांनाही अंतर्मुख करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.



