Amaravti GramincitynewsMaharashtraNagpurNagpur graminUncategorized

नागपुरात विवाहितेचा छळ; मुलगी जन्माला आल्याने मारहाण, तिहेरी तलाक देत घराबाहेर हाकलल्याचा आरोप

नागपूरातून महिलांवरील अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून एका विवाहित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर पतीने तिला तिहेरी तलाक देत घराबाहेर हाकलून दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी पती आणि सासूविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला रुखसार शेख या नागपूरच्या इतवारी परिसरातील मस्कासाथ भागात राहतात. त्यांचा विवाह ३१ मे २०२४ रोजी इम्रान रशीद शेख याच्यासोबत झाला होता. माहितीनुसार, हे इम्रानचे दुसरे लग्न होते. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र काही दिवसांनंतर सासू सईदा बेगम यांनी आपल्या मुलाला रुखसार यांच्या विरोधात भडकवण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर घरात सतत वाद, मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक सुरू झाली. ११ ऑगस्ट २०२५ रोजी रुखसार यांनी आयरा नावाच्या मुलीला जन्म दिला. मुलगी जन्माला आल्यानंतर पती आणि सासूच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तिला सतत टोमणे मारणे, अपमान करणे आणि मानसिक छळ करण्याचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, पती इम्रान याने अनेक वेळा तिच्यावर मारहाण केली. २४ एप्रिल रोजी त्याने रुखसार यांना निर्दयपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी त्याने तीन वेळा ‘तलाक’ उच्चारत तिला घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत रुखसार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतरही २४ मे रोजी पुन्हा तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

सततच्या छळाला कंटाळून अखेर रुखसार यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती इम्रान रशीद शेख आणि सासू सईदा बेगम यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तपासादरम्यान इम्रानवर त्याच्या पहिल्या पत्नीचाही छळ केल्याचे आरोप समोर आल्याची माहिती आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे नागपूर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, मुलगी जन्माला आल्यामुळे महिलांचा छळ होणं ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तिहेरी तलाकसारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button