वेदांताच्या बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा २३ वर; आणखी दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू

छत्तीसगडमधील सिंगताराई येथील वेदांताच्या औष्णिक वीज प्रकल्पात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटानंतर मृतांचा आकडा आता २३ वर पोहोचला आहे. उपचारादरम्यान आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अजूनही १२ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
१४ एप्रिल रोजी सिंगताराई येथील वेदांत थर्मल पॉवर प्लांटमध्ये हा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत अनेक कामगार गंभीर भाजले गेले होते. शनिवारी रायपूरमधील कालडा रुग्णालयात एका कामगाराचा, तर रायगड मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २३ झाली आहे.
दरम्यान, मुख्य बॉयलर निरीक्षकांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात स्फोटाचे कारण स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, बॉयलरच्या फर्नेसमध्ये इंधनाचा अतिरिक्त साठा झाला होता. त्यामुळे आतमध्ये अचानक दाब वाढला. वाढलेल्या दाबामुळे खालचा पाइप निखळला आणि संपूर्ण रचना कोसळत भीषण स्फोट झाला.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनेही या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे. अहवालात म्हटले आहे की, यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक उष्णता आणि दाब मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही आणि अनेक जण आगीत सापडले.
घटनेतून बचावलेल्या कामगारांनी सांगितले की, स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. अनेकजण जखमी सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासन आणि दभरा पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.
या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी केंद्र सरकारचे एक विशेष पथक १८ एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे. या तपासानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार असून, नेमकी जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांच्या निर्देशानुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात वेदांताचे संचालक अनिल अग्रवाल, कंपनीचे व्यवस्थापक देवेंद्र पटेल तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. “छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील वीज प्रकल्पातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे,” असे मोदी म्हणाले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.



