“अंगार मुक्त अभियान” : वनवणवा रोखण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाची मोठी मोहीम!

नागपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प (१० एप्रिल २०२६) :
“जंगल वाचलं तरच भविष्य वाचेल” हा महत्त्वाचा संदेश देत पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘अंगार मुक्त अभियान’ सुरू करण्यात आले आहे. वनवणवा रोखणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे या उद्देशाने वनविभागाने ही विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत वनविभागाकडून विविध गावांमध्ये व्यापक जनजागृती केली जात आहे. उपसंचालक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरबाहुली उपवनक्षेत्रात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत सराखा, सत्रापुर, बोरडा, खुमारी आणि अतिदुर्गम किरंगी सर्रा या गावांमध्ये थेट जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात नागपूर विद्यापीठाच्या पथनाट्य चमूने प्रभावी सादरीकरण करून लोकांचे लक्ष वेधले.
पथनाट्याच्या माध्यमातून —
👉 वनवणवा कसा टाळायचा
👉 शेती करताना कोणती काळजी घ्यावी
👉 मोहफूल आणि तेंदूपत्ता गोळा करताना पाळायचे नियम
👉 वन्यप्राणी दिसल्यास कसे वागावे
— याबाबत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
वनविभागाने स्पष्ट केले की, वनवणवा ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून अनेकदा मानवी निष्काळजीपणामुळे घडते. यामुळे जंगलाचे मोठे नुकसान होते, वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो.
या कार्यक्रमात वनविभागाचे अधिकारी, PRT टीम, शेतकरी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
“ही मोहीम केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
🌿 संदेश :
जंगल वाचलं तरच पर्यावरण वाचेल… आणि पर्यावरण वाचलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील!
👉 वनवणवा टाळा, जंगल वाचवा! 🌳🔥



