मुंबई-गोवा महामार्गावर भीषण बस अपघात; 2 ठार, 38 जखमी

शुक्रवारी (३ एप्रिल) पहाटे मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळ सुकळी खिंडीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ ते ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस सुकळी खिंडीतून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघाताची तीव्रता इतकी होती की बस पूर्णपणे उलटली.
अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही वेगाने प्रतिसाद देत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.
सर्व जखमींना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे.
दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, चालकाचा वेग किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



