समृद्धी महामार्गावर मृत्यूचा कहर! ट्रकच्या धडकेत ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू; राज्य हादरलं

जालना | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात आज सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार माजला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे सहा निष्पाप महिलांचा जीव गेला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा – सिटी न्यूज



