“बंगालला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपाला महागात पडेल”; ममता बॅनर्जींचा इशारा

कोलकाता (प्रतिनिधी):
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका करत, बंगालला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाला देशातील सत्ता गमवावी लागेल, असा इशारा दिला आहे.
राणीगंज येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका सलग चौथ्यांदा जिंकल्यानंतर त्या दिल्ली जिंकण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणतील. “जर राज्यात भाजप सत्तेत आली, तर ते बुलडोझर चालवून लोकांना बाहेर काढतील,” असा आरोप त्यांनी केला.
मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून मतदारांची नावे वगळली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “एक ‘लक्ष्मण रेषा’ असते, पण भाजप सर्व मर्यादा ओलांडत आहे,” असेही त्या म्हणाल्या.
रामनवमी शोभायात्रेदरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. “मी निवडून आलेली मुख्यमंत्री आहे, पण माझ्या अधिकारांवर गदा आणली जात आहे,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर आणि रघुनाथगंज भागात रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या झडपांमुळे तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोड आणि आगजनीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल.



