वाघोड पिक संरक्षक संस्थेवर गंभीर आरोप; शेतकरी पुत्राची दुय्यम निबंधकांकडे तक्रार

रावेर तालुक्यातील वाघोड येथे पिक संरक्षक सहकारी संस्थेच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हरभरा पिकाच्या नुकसानीबाबत दिलेली तक्रार संस्थेने फेटाळल्याने शेतकरी पुत्राने दुय्यम निबंधकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रावेर तालुक्यातील वाघोड गावातील पिक संरक्षक सहकारी संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गावातील कमलेश पाटील यांनी हरभरा पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार संस्थेकडे ६ मार्च २०२६ रोजी केली होती.
मात्र संचालक मंडळाने अर्जदार हा शेतकरी सभासद नसल्याचे तसेच त्यांच्या वडिलांवर संस्थेची थकबाकी असल्याचे कारण देत ही तक्रार निकाली काढल्याचे सांगितले जाते.
या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कमलेश पाटील यांनी रावेर येथील दुय्यम निबंधक सहकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.
पिकाची चोरी झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी तसेच संस्थेच्या संचालक मंडळ आणि सचिवांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, अर्जदाराचे वडील हे संस्थेचे सभासद असून त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातील कर्ता मुलगा म्हणून आपण न्याय मागितला. मात्र सभासद नसल्याचे कारण देत तक्रार फेटाळणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून हरभरा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाघोड येथील पिक संरक्षक सहकारी संस्थेच्या कारभारावर झालेले आरोप आता चौकशीच्या टप्प्यावर आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



