नागपूरमध्ये शेतातील खोलीत अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

नागपूर शहरातील नारा गावातील शेतातील एका खोलीत अज्ञात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या अंगाला अळ्या लागलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारा गावातील ओम शांती नगरी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर रामाजी तळेकर यांच्या मालकीची या भागात सुमारे सात एकर शेती आहे. या शेतीवर देखरेखीचे काम करण्यासाठी त्यांनी सोनू उर्फ गोलू अरुण जिभे या व्यक्तीला मागील दहा वर्षांपासून नोकर म्हणून ठेवले आहे.
या शेतातील काही भाग विटभट्टीसाठी भाड्याने देण्यात आलेला असून दुसऱ्या बाजूला फिर्यादीने १० बाय १० आकाराच्या पाच खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये गुरांचा चारा ठेवला जात होता, तर काही खोल्या भाड्यानेही देण्यात आल्या होत्या.
दरम्यान ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सोनू जिभे याने शेतमालक मोरेश्वर तळेकर यांना माहिती दिली की, रूम क्रमांक चारमध्ये एक अनोळखी महिला मृत अवस्थेत पडलेली आहे.
ही माहिती मिळताच तळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे ३५ वर्षे वयाची अज्ञात महिला अर्धनग्न अवस्थेत मृत पडलेली दिसून आली. महिलेच्या शरीराला अळ्या लागलेल्या असल्यामुळे तिचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत महिलेची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
नागपूरमधील या धक्कादायक घटनेत मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



