फक्त सहा तासांत खुनाचा आरोपी अटकेत; अमरावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अमरावती प्रतिनिधी :
अमरावती शहर गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या सहा तासांत अटक करत धडाकेबाज कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
राजापेठ परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून शुभम किशोर ठाकरे या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
मृत्यूपूर्वी दारू पिण्यावरून वाद झाल्याचे निष्पन्न झाले. या वादातूनच आरोपीने शुभमला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अमरावती शहर गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अवघ्या सहा तासांत त्याला ताब्यात घेतले. अनुज दीपक पांडे (वय २१, रा. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जलद कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.



