नागपूर हादरलं; कचऱ्यात नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात संताप

नागपूर प्रतिनिधी :
नागपूर शहरातील मोहन नगर खलाशी लाईन परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक महिला नेहमीप्रमाणे कचरा टाकण्यासाठी गेली असता तिला कचऱ्यात बाळाचे डोके दिसले. संशय आल्याने तिने तत्काळ आसपासच्या नागरिकांना बोलावले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता तेथे नवजात मुलाचा मृतदेह पडलेला असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तो इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, बाळ जिवंत जन्माला आले होते का, मृत्यूचे नेमके कारण काय आणि हा प्रकार कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि नागरिकांची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे शहरात मानवी संवेदनशीलतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“निष्पाप जीवाचा अंत… दोषी कोण? पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण शहराचे लक्ष!”



