नांदेडमध्ये खत वितरणावर मोठा घोटाळा? सहकारी संस्थांवर गंभीर आरोप

नांदेड, प्रतिनिधी :
नांदेड जिल्हा येथे खतांच्या वितरणावरून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जैविक खते उत्पादक सहकारी संस्थांकडून सहकार तत्वाला बगल देत रासायनिक खतांची थेट किरकोळ विक्रेत्यांना विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा न करता ही खते जिल्ह्याबाहेर तसेच राज्याबाहेर विकली जात असल्याचा दावा धनराज मंत्री यांनी केला आहे.
शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या बांधावर खतांचे वितरण करणे अपेक्षित असताना काही बोगस सहकारी संस्था स्वतःच्या नावावरील घाऊक परवानाधारक केंद्रांमधून थेट किरकोळ विक्रेत्यांना खतांची विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.
धनराज मंत्री यांनी सांगितले की, संबंधित खतांचा साठा जिल्ह्याबाहेर वळवला जात असून याबाबत पुराव्यासह नांदेड कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदने देण्यात आली आहेत. तसेच उपोषण करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सहकार तत्वाला हरताळ फासून काही संस्था केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने काम करत असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अधिवेशन काळात मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतांवर डल्ला मारला जात असल्याच्या आरोपांमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



