AkolaCrime NewsLatest NewsMaharashtra

अकोला मध्ये रील स्टार बनण्याच्या हव्यासापायी २१ लाखांची चोरी

मैत्रिणीच्या घरावर डल्ला; मुख्य महिला आरोपीसह चौघांना अटक

अकोला :
रील स्टार बनण्याचं स्वप्न, महागडा मोबाईल, कॅमेरा आणि लक्झरी लाईफस्टाईलची हौस… आणि या हौसेपायी एका १९ वर्षीय तरुणीने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. स्वतःच्या मैत्रिणीच्या घरावर डल्ला मारत तब्बल २१ लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य महिला आरोपीसह तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

ही घटना अकोला शहरातील सागर कॉलनी परिसरात घडली. फिर्यादी नेहा सावदेकर आणि आरोपी महिला या दोघी एकमेकींच्या शेजारी राहत असून त्यांच्यात चांगली ओळख होती. रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपीने नेहाला स्वतःच्या घरी बोलावले. काही काम असल्याचे सांगून ती बाहेर पडली आणि नेहाला आपल्या घरी गुंतवून ठेवले. त्याच संधीचा फायदा घेत आरोपीने नेहाच्या घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

या चोरीमध्ये ५२ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ४० ग्रॅमचे दोन मोठे नेकलेस, १२ ग्रॅमची सोन्याची चेन व लॉकेट, १५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, २० ग्रॅमचे दोन पोत, ३ ग्रॅमचे ब्रेसलेट, १८ ग्रॅमचा लहान नेकलेस आणि ९० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे २१ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

पोलिसांच्या तपासादरम्यान महिला आरोपीने तिचा प्रियकर ऋतिक शृंगारे तसेच साथीदार वैभव गोपनारायण आणि समीर तेलखडे यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १३८ ग्रॅम सोनं (किंमत अंदाजे २१ लाख रुपये) आणि ५० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाच्या आहारी जाऊन तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button