Accident NewsAmaravti GraminLatest News

वरुडमध्ये भीषण अपघात: शिवाई बस-ऑटोच्या धडकेत शाळकरी मुलीसह चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर

वरुड

वरुड तालुक्यातील राजुरा-वर्धा मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. वरुडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भरधाव धावणाऱ्या शिवाई बस आणि ऑोच्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ऑटोमध्ये प्रवासी बसलेले असताना समोरून येणाऱ्या बसची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.

या दुर्घटनेत वडेगाव येथील १३ वर्षीय शाळकरी मुलगी माही मांगुळकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच ८३ वर्षीय वृद्धासह आणखी दोन ग्रामस्थांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला.

अपघातानंतर रुग्णसेवक अभिषेक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. सध्या राजकुमार भलावी, मोहिनी भोरे आणि प्रतिभा लाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर राजुरा-वर्धा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्परतेने मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.

या भीषण अपघातामुळे संपूर्ण वरुड तालुका हादरला असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button