“PM मोदींसोबत काहीतरी अनपेक्षित घडलं असतं!” लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचा खळबळजनक खुलासा; संसदेत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली: संसदेच्या इतिहासात कधीही घडली नाही अशी धक्कादायक माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी दिली. “काँग्रेसचे काही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनापर्यंत पोहोचून कोणतीही अनपेक्षित घटना घडवू शकतात, अशी ठोस माहिती मला मिळाली होती. त्यामुळेच मी स्वतः पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली,” असा खळबळजनक खुलासा ओम बिर्ला यांनी केला आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान उत्तर देणार होते, मात्र त्यापूर्वीच झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी ही माहिती ‘ऑन रेकॉर्ड’ दिली आहे.
पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घालण्याचा प्रयत्न?
ओम बिर्ला यांनी सांगितले की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात अत्यंत गैरवर्तन केले. विशेषतः काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या रिकाम्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा आणि अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जाण्याचा प्रयत्न केला. “जर पंतप्रधान सभागृहात आले असते आणि तिथे काही अघटित घडले असते, तर ते लोकशाहीसाठी निंदनीय ठरले असते. कालचा प्रकार संसदेच्या इतिहासातील एक काळा डाग आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
वादाच्या भोवऱ्यात महाराष्ट्राच्या दोन खासदारांसह ‘या’ ६ महिला
अध्यक्षांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या ६ महिला खासदारांची नावे स्पष्ट केली आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश आहे:
- वर्षा गायकवाड (महाराष्ट्र)
- शोभा बच्छाव (महाराष्ट्र)
- आर. सुधा
- ज्योतिमणी
- गेनी बेन ठाकोर
- के. काव्या
नेमकं कारण काय होतं?
विरोधी पक्षाचे खासदार अमेरिकेसोबतचा व्यापार करार आणि माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून आक्रमक झाले होते. भाजप सदस्य पी.पी. चौधरी भाषण करत असतानाच, विरोधी सदस्यांनी फलक घेऊन सत्ताधारी बाकांकडे कूच केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पंतप्रधानांचे भाषण होण्यापूर्वीच अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले.
“राजकीय मतभेद अध्यक्षांच्या कार्यालयापर्यंत नकोत”
ओम बिर्ला यांनी विरोधकांना इशारा देताना म्हटले की, “राजकीय मतभेद असू शकतात, पण ते अध्यक्षांच्या आसनापर्यंत आणण्याची परंपरा या सभागृहात कधीच नव्हती. संसदेचा आदर राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.”
या सर्व प्रकरणावर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.



