ट्रॅफिक जॅमचा कंटाळा आला! ८ तास एक्सप्रेसवेवर अडकल्यावर उद्योगपतीने थेट ‘हेलिकॉप्टर’ बोलावलं; सुटका करून घेत गाठलं पुणे

लोणावळा/पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारपासून झालेला ३२ तासांचा महाभयंकर ट्रॅफिक जॅम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हजारो लोक अन् शेकडो गाड्या रस्त्यावर अडकून पडल्या होत्या. मात्र, याच कोंडीत अडकलेल्या एका बड्या उद्योगपतीने जे केलं, त्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल ८ तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर या उद्योगपतीने चक्क हेलिकॉप्टर बोलावून आपली सुटका करून घेतली.
८ तासांचा थरार आणि थेट ‘एअर लिफ्ट’
हे उद्योगपती म्हणजे ‘पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. सुधीर मेहता होय. डॉ. मेहता हे मुंबईहून पुण्याकडे येत असताना एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. तब्बल ८ तास गाडीत बसून राहिल्यानंतरही रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसेना, तेव्हा त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मेहता यांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. ते पुन्हा मुंबईच्या दिशेने फिरले आणि जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट पुणे गाठले. आपल्या या अनुभवानंतर त्यांनी सोशल मीडियावर प्रशासनाचे कान टोचले आहेत.
“जागोजागी हेलिपॅड उभारा…”
डॉ. सुधीर मेहता यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर आपली व्यथा मांडताना सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:
- हेलिपॅडची गरज: “एका हेलिपॅडसाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी एक्सप्रेसवेवर ठराविक अंतरावर हेलिपॅड असणे अनिवार्य केले पाहिजे.”
- एक्झिट पॉईंट्स: “अशा भीषण कोंडीत वाहनांना मागे फिरण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी एक्सप्रेसवेवर जागोजागी ‘एक्झिट पॉईंट्स’ असायला हवेत.”
- जीवाशी जुगार: “सध्या या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी जुगार खेळण्यासारखे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसचा टँकर उलटला होता. गॅस गळतीमुळे सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. हा मार्ग तब्बल ३२ तासांनंतर, म्हणजेच गुरुवारी पहाटे १ वाजता पूर्णपणे सुरू झाला.
चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने ‘अराजक’
डॉ. मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये ट्रॅफिकमधील एक फोटो शेअर करत म्हटले की, केवळ अपघातच नाही तर अनेक वाहनचालक ‘राँग साईड’ने गाड्या चालवत होते, ज्यामुळे परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली आणि संपूर्ण अराजक माजले.



