Latest NewsMaharashtra Politics

रात्री ९ ते १२… जयंत पाटलांच्या घरी नेमकं काय घडलं? अजित पवार आणि बड्या नेत्यांच्या ‘त्या’ गुपित बैठकीचा मोठा खुलासा!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक भूकंप घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्या मागे मागील काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या (NCP Merger) हालचाली अत्यंत गुप्तपणे सुरू होत्या, ज्याचा आता मोठा खुलासा झाला आहे.

जयंत पाटलांचे निवासस्थान आणि ३ तासांची खलबतं

मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल तीन तास चालली. या बैठकीला स्वत: अजित पवार उपस्थित होते. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत ज्या नेत्यांना अडचण येऊ शकते, अशा प्रमुख नेत्यांनाच या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

बैठकीत ‘या’ विषयांवर झाली सविस्तर चर्चा:

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत केवळ विलीनीकरणच नाही, तर नेत्यांच्या वैयक्तिक मतदारसंघातील गणितांवरही चर्चा झाली:

  • जितेंद्र आव्हाड यांची भूमिका: जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पक्ष एकत्र आल्यास कळवा-मुंब्रा मतदारसंघातील मतदारांची काय प्रतिक्रिया असेल आणि तिथे काय पर्याय असू शकतो, यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर आव्हाड काहीसे नाराज किंवा पक्षापासून लांब गेल्याचे दिसून आले.
  • हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील: इंदापूरच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांचे मुख्य विरोधक दत्तामामा भरणे आहेत. विलीनीकरण झाल्यास त्यांचे समायोजन कसे करायचे, यावर तोडगा काढताना अंकिता पाटील यांना ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत सुचवण्यात आले होते.
  • अशोक पवार आणि माऊली कटके: शिरूरमध्ये अशोक पवार यांच्या विरोधात माऊली कटके निवडून आले होते. या दोन्ही नेत्यांचे समायोजन आणि अडचणीत असलेला ‘घोडगंगा’ साखर कारखाना सुस्थितीत आणण्याबाबत अजित पवारांनी शब्द दिल्याचे समजते.
  • प्राजक्त तनपुरे: माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या रणनीतीवरही या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

अजित पवारांची ‘वन टू वन’ चर्चा

या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे, आधी सर्व नेत्यांशी सामूहिक चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी प्रत्येक नेत्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. प्रत्येकाच्या मनातील भीती आणि शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी या तीन तासांत केला. विलीनीकरणाची ही इच्छा अजित पवारांची अंतिम इच्छा असल्याचेही आता बोलले जात आहे.

सुनेत्रा पवार ‘तो’ निर्णय पूर्ण करणार?

अजित पवारांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, विलीनीकरणाचा प्रस्ताव आजही खुला आहे. आता सुनेत्रा पवार विलीनीकरणाबाबत काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button