Crime NewsGondiaLatest News

शाळेजवळ अवैध उत्खननाचा सापळा; अर्जुनी/मोरगाव तालुक्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्राम आसोली (पोस्ट कोरंबी टोला) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. शाळेच्या अगदी लगत माती व मुरूमसाठी खोल आणि मोठे खड्डे खोदण्यात आल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.

शाळेत ये-जा करणारी लहान मुले, तसेच परिसरातील जनावरे व जंगली प्राणी या उघड्या खड्ड्यांमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

या उत्खननातून निघणारी माती कोणत्याही शासकीय कामासाठी न वापरता ती थेट खासगी बांधकामांवर पाठवली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, अवैध उत्खनन माफियांना खुलेआम बेकायदेशीर कमाईची संधी मिळत आहे.

सदर परिसर जंगल व तलावांनी वेढलेला असून जनावरांचा मुक्त संचार आहे. अशा ठिकाणी उघडे ठेवलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे चित्र आहे. मात्र, तलाठी, तहसीलदार, एसडीओ यांच्यासह संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महिन्यांपासून तालुक्यात अवैध उत्खनन सुरू असतानाही कारवाई न झाल्याने माफियांचे धाडस वाढत चालले आहे. या प्रकरणामागे कोणाचा आशीर्वाद आहे, माफियांना कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा थेट सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button