AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

अमरावती मनपा निवडणूक : बंदद्वार चर्चेनंतरही रवी राणा ठाम; युवा स्वाभिमानचे उमेदवार मैदानात कायम

अमरावती :

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीत असतानाही आमदार रवी राणा यांची स्वतंत्र भूमिका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दीड तास बंदद्वार चर्चा झाल्यानंतरही युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार माघार घेणार नसल्याची स्पष्ट माहिती स्वतः आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येत आहे. आमदार रवी राणा आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेल्या बैठकीला निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे उपस्थित होते. मात्र या बैठकीतून युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवारांबाबत कोणताही तोडगा निघाल्याचे दिसून आले नाही.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले की, अमरावती महानगरपालिकेतील ३४ ते ३५ प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तसेच भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण पण स्वतंत्र लढत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप ज्या प्रभागांमध्ये मजबूत आहे तेथे भाजपचे उमेदवार निवडून येतील, तर जिथे युवा स्वाभिमान संघटना मजबूत आहे तेथे त्यांचे उमेदवार विजयी होतील. परिस्थितीनुसार एकमेकांना पाठिंबा दिला जाईल, असे संकेतही रवी राणा यांनी दिले.

दरम्यान, शुक्रवारी भाजप, युवा स्वाभिमान संघटना तसेच दोन्ही पक्षांतील बंडखोर मिळून एकूण ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहितीही आमदार रवी राणा यांनी दिली. त्यामुळे आता अमरावतीतील निवडणूक लढत अधिक स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे महायुतीत एकत्र असल्याचे चित्र असले, तरी दुसरीकडे अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना स्वतंत्र पण मैत्रीपूर्ण लढत देताना दिसणार आहेत. आमदार रवी राणा यांच्या भूमिकेमुळे अमरावती महानगरपालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button