Latest NewsMaharashtra

गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल

गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस दलात ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ३० स्कॉर्पिओ वाहने, २ बस आणि २ मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या कार्यक्रमाला वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्या वाहनांमुळे जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात जलद गस्त घालणे, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे, नक्षलविरोधी मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवणे तसेच दैनंदिन पोलीस कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे.

स्कॉर्पिओ वाहने गस्त व ऑपरेशनल कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, बस वाहनांचा वापर पोलीस पथकांच्या वाहतुकीसाठी तसेच विशेष मोहिमांसाठी करण्यात येणार आहे. तर मोटारसायकलींमुळे अरुंद व अतिदुर्गम मार्गांवरही पोलीस उपस्थिती वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या वाहन ताफ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button