Latest NewsMaharashtrapolitics

…तर ठाकरेंच्या जागा मनसेला?

पुणेकर झोपेत असतानाच घडामोडी; अजित पवार आणि भाजपाचं टेन्शन वाढवणारी रात्र

पुण्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीदरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला आव्हान देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.


अजित पवारांचा प्रयत्न फसला

अजित पवारांसोबत न जाण्याचा निर्णय शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जाहीर केला. अजित पवारांनी निवडणूक ‘घड्याळ’ या चिन्हावरच लढवण्याची अट घातली होती. मात्र ही अट मान्य नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केल्याचं काकडे यांनी सांगितलं. दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे अखेर दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या मार्गाने जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.


अजित पवारांसह भाजपाचंही टेन्शन वाढलं

अजित पवार-शरद पवार युती फसली असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडी (मविआ) पुण्यात मोठी मोट बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ अजित पवारच नव्हे तर भाजपाचंही टेन्शन वाढवण्यासाठी मविआकडून मनसे आणि वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.


रात्री अडीचपर्यंत गुप्त बैठक

पुण्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक पार पडली. ही बैठक तब्बल शनिवार पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पदाधिकारी वसंत मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे उपस्थित होते. तसेच शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे पदाधिकारीही बैठकीला हजर होते.

या बैठकीत महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पुण्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतं.


अजित पवार आणि भाजपावगळता सर्व एकत्र?

या गुप्त बैठकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा वगळता इतर सर्व पक्ष एकाच छताखाली एकत्र येण्याची तयारी करत असल्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुण्यात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


…तर शिवसेनेच्या जागा मनसेला?

महाविकास आघाडीची बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू असतानाच नंतर स्थानिक मनसे पदाधिकारीही बैठकीत सहभागी झाल्याची माहिती आहे. पुण्यात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत.

जर मविआचं जागावाटप यशस्वी झालं, तर शिवसेनेच्या कोट्यातील काही जागा मनसेला देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.


वंचित आघाडीही मविआत?

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही सामील होणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलं आहे. वंचित आघाडीने मविआकडे 40 जागांची मागणी केल्याची माहिती असून, ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्यातील जागावाटप ते आपापसात ठरवतील असंही त्यांनी सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button