Latest NewsMaharashtrapolitics

उत्पादकता वाढविण्यासाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येणार

राज्यातील शेतीची उत्पादकता आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून ‘मिशन नैसर्गिक शेती’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या दोन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली आणली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान’ संमेलनात बोलत होते. यावेळी सत्यनारायण नूवाल आणि पद्मश्री डॉ. डी. के. यादव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

नैसर्गिक शेतीमुळे शाश्वत विकासाला चालना

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि ग्राहकांना दर्जेदार व आरोग्यदायी अन्न मिळेल. पर्यावरणपूरक शेती ही काळाची गरज असून राज्य सरकार यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रात एआयचा स्वीकार गरजेचा

आज सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एलआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर एआयचा स्वीकार केल्यास जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारे विद्यार्थी घडविता येतील, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मान्यवरांचा सन्मान

कार्यक्रमादरम्यान डॉ. आर. एल. सोनोलिकर आणि अरुण दांडेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दीपक लव्हाळा यांना देण्यात आला.
तसेच ज्वेल ऑफ एलआयटी पुरस्कार डॉ. सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, आर. जी. कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना, तर युथ आयकॉन पुरस्कार चिंतन शाह यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रेरणादायी विचार

पद्मश्री डॉ. डी. के. यादव म्हणाले की, शिक्षण संस्था केवळ अभ्यासक्रमांमुळे नव्हे तर तिच्या विद्यार्थ्यांमुळे मोठी होते.
दृढ संकल्प असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, असे सत्यनारायण नूवाल यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची माहिती

रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांना लक्ष्मीनारायण गीताद्वारे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माधव लाभे यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत माधव लाभे यांनी, सत्यनारायण नूवाल यांचे स्वागत कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी, तर पद्मश्री डॉ. यादव यांचे स्वागत मोहन पांडे यांनी केले.

संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राकेश गुप्ता, उत्कर्ष खोपकर आणि मोहन पांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सचिन पळसोडकर आणि मिली जुनेजा यांनी केले, तर आभार डॉ. अतुल वैद्य यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button