शिवसेना आणि धनुष्यबाण जनतेच्या न्यायालयात जिंकले’; पक्ष-चिन्ह चोरल्याच्या टीकेवर निकालानंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण घराघरात पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष-चिन्ह चोरल्याच्या टीकेला ठाम प्रत्युत्तर दिलं आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राइक रेट पुन्हा एकदा कडक राहिल्याचं सांगत, येणाऱ्या पालिका निवडणुकांतही हाच ट्रेंड कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे’
निवडणूक निकालानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,
“जे निवडणुकीत घरी बसले होते, त्यांना मतदारांनी कायमचं घरी बसवलं. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते.
लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कार्यकर्तेच उमेदवार निवडून देत असतात. त्यामुळे मी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला सांगितलं आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आदेश दिले होते.”
‘तळागाळातील मतदारांनी साथ दिली’
“आम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली आणि तळागाळातील मतदारांनी शिवसेनेला भरभरून साथ दिली. त्यामुळेच हे यश शक्य झालं,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
महायुतीला 75 टक्क्यांहून अधिक यश
महायुतीच्या कामगिरीबाबत बोलताना शिंदे म्हणाले,
“काही ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो, तर काही ठिकाणी वेगळे लढलो. तरीही 75 टक्क्यांपेक्षा जास्त यश महायुतीला मिळालं आहे.
मी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांना जनतेची पसंती मिळाली. विकासाचा अजेंडा आणि स्थानिक प्रश्नांवर भर दिल्यामुळेच हे यश मिळालं.”
‘कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार’
कोकणातील निकालांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले,
“कोण विभागाचा कायापालट करू शकतो, हे लोक पाहत असतात आणि त्यांनाच निवडून देतात. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणार आहे. आज शिवसेना ठाणे-मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
आपत्ती तिथे शिवसेना असं समीकरण राज्यात तयार झालं आहे.”
‘पहिल्याच निवडणुकीत एवढं मोठं यश’
“पक्षाची ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असूनही इतकं मोठं यश मिळालं, ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीची पावती आहे,” असंही शिंदे म्हणाले.
‘खरी शिवसेना कोणाची, हे जनतेनं ठरवलं’
महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे म्हणाले,
“महाविकास आघाडीतील सगळ्यांची बेरीज केली तरी आम्ही जास्त आहोत.
काही लोकांना शिवसेना आपली मक्तेदारी वाटत होती. पण शिवसेना कोणाची, याचं उत्तर जनतेनं दिलं आहे.
इथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. खरी शिवसेना कोणाची, हे जनतेच्या न्यायालयात स्पष्ट झालं आहे.”
पक्ष-चिन्ह चोरल्याच्या टीकेवर प्रत्युत्तर
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले,
“जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाण जिंकले आहेत. निकालच सर्व काही बोलतो.”



