Crime NewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळात धक्कादायक सायबर फसवणूक; 1,500 लोकसंखेसाठी 27,000 जन्मनोंदी

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावाची एकूण लोकसंख्या फक्त 1,500 असताना ग्रामपंचायतीच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (CRS) मध्ये तब्बल 27,397 जन्मनोंदी आणि 7 मृत्यू नोंदी आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत तातडीने तपास सुरु केला गेला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना माहिती दिली. त्वरित चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, या जन्म-मृत्यूच्या नोंदी शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नसून संपूर्णपणे संशयास्पद आहेत.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, शेंदूरसनी ग्रामपंचायतीचा CRS आयडी मुंबई येथे मॅप असल्याचे आढळले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे कडे पाठवण्यात आले. राज्यस्तरीय लॉगिनद्वारे तपासणी केल्यानंतर या नोंदींची माहिती दिल्ली येथील अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC), दिल्ली कडे तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. प्राथमिक तांत्रिक तपासणीत हा प्रकार सायबर फ्रॉड असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button