अमरावतीत सोशल मीडियावर घातक शस्त्रासह फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : सोशल मीडियावर घातक शस्त्रासह फोटो व्हायरल करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या तरुणावर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. इंस्टाग्रामवर शस्त्रासह फोटो टाकणारा इसम अबिषेक उध्दव मेश्राम (वय २४, रा. जवेड नगर) ताब्यात घेतला गेला आहे.
गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही दिवसांपासून अभिषेक उध्दव मेश्राम इंस्टाग्रामवर घातक शस्त्रासह फोटो अपलोड करत आहे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून परिसरात भीती निर्माण करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली.
१७ डिसेंबर रोजी जवेड नगर येथे अभिषेक उध्दव मेश्राम शस्त्रासह उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून एक चायना बनावटीचा घातक चाकू जप्त करण्यात आला आहे.
सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम ४/२५ आर्म अॅक्ट तसेच कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली आहे.



