नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा दणका

नागपूर, दि. 15 डिसेंबर: नागपूर शहरातील तहसिल पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत धडक कारवाई करत अवैध तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मा. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशान्वये राबविलेल्या या मोहिमेत, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१७ ते रात्री ८.४५ या वेळेत तहसिल पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत नामदेव श्रावण तराले (वय ४५) याच्या घरी छापा टाकण्यात आला.
छाप्यामध्ये आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू, पानमसाला आणि विविध फ्लेवरचे तंबाखू पाऊच विक्रीसाठी साठवलेले आढळले. पोलिसांनी ३४१ किलो ९६ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ४,१४,५६२ रुपये आहे.
पोलीसांनी सांगितले की आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होता.
नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’मुळे तंबाखू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.



