Latest NewsNanded

नांदेड जिल्ह्यात मृत शेतकऱ्याला एसबीआयची लोकअदालत नोटीस; गावकऱ्यांचा संताप

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाडी नियमतुल्लापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी अनेक शेतकऱ्यांना लोकअदालताची नोटीस पाठवण्यात आली. मात्र यामध्ये दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्यालाही नोटीस पाठवण्यात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

खंडू सटवाजी मेंढेवाड या शेतकऱ्यांचे निधन 28 जानेवारी 2023 रोजी झाले होते. त्यांच्या नावावर 1 लाख 4 हजार 731 रुपये इतके कर्ज थकलेले असल्याचे बँकेने दाखवले आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने 13 डिसेंबर रोजी लोकन्यायालयात हजर राहण्याचे आदेश मेंढेवाड यांना पाठवले. मृत व्यक्तीला पाठवलेली नोटीस ही गंभीर बेपर्वाई असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

अतिवृष्टीमुळे आणि उत्पादन घटल्यामुळे शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरले असून साधारणतः एका बॅगला ८–९ क्विंटल मिळणारे सोयाबीन थेट १ क्विंटलवर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कोसळले असून कर्जफेड करणे त्यांच्यासाठी अशक्य झाले आहे.

या प्रकाराचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर खराब सोयाबीन टाकून आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी इशारा दिला की हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. काही वर्षांपूर्वी बँक कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या; आता गरज पडल्यास राजकीय नेत्यांच्या गाड्यांनाही लक्ष्य केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारने 30 जूनपर्यंत कर्जफेड थांबवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र बँका कोर्टाच्या नोटिसा पाठवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “सरकारचा बँकांवर काहीही धाक राहिला नाही का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणामुळे कर्जबाजारीपणाने त्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा समोर आला असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button