वाशिम आणि रिसोड नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर— उमेदवारांमध्ये नाराजीची भावना

वाशिम जिल्ह्यातील प्रलंबित नगर परिषद निवडणुकांची तारीख अखेर स्पष्ट झाली आहे. वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषदेतील लांबलेल्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.
प्रशासनिक आक्षेपांमुळे काही काळ थांबलेल्या या निवडणुकांमध्ये वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह 32 जागांसाठी, तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 (ब) आणि 10 (अ) या दोन नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे.
नवीन कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
दोन्ही नगर परिषदेचे मतदान २० डिसेंबर रोजी पार पडणार असून, मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या दिवशीच पूर्वी मतदान झालेल्या रिसोड, मंगरूळपीर, कारंजा आणि मालेगाव नगर पंचायत यांच्या मतमोजणीचाही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील विलंबामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे. पुन्हा एकदा २० दिवसांचा प्रचार, घर-दौरे आणि रॅलींचा ताण सहन करावा लागणार असल्याने त्यांचे आर्थिक आणि शारीरिक खर्च वाढणार आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता वाशिम आणि रिसोडमधील निवडणूक रंगत कशी वाढते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



