भावनिक होणे हे कर्मचा-यांचे आपल्या संस्थेप्रती असलेले नि:स्सीम प्रेम – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
अमरावती – (दि. 30.11.2025) विद्यापीठातून सेवानिवृत्त होत असतांना कर्मचा-यांचे डोळे पाणावतात आणि हेच कर्मचा-यांचे आपल्या संस्थेप्रती असलेले नि:स्सी प्रेम दर्शविते, असे उद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, नियंत्रण अधिकारी रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.बी. नाईक, शैक्षणिक विभागाच्या प्रशासकीय केंद्राचे प्रशासकीय अधिकारी डॉ. एन.व्ही. फिरके, आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव सौ. मिनल मालधुरे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती डॉ. प्रशांत शिंग्वेकर, सौ. शिंग्वेकर, श्री जी.के. जनवार, सौ. जनवार, श्री के.बी. पाटील, सौ. पाटील, श्री डब्ल्यू. एन. चोपडे, सौ. चोपडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, कर्मचारी आपल्या कुटुंबाप्रमाणे काम करतात, त्यामुळे कुटुंबातून ते सेवानिवृत्त होत आहेत, असे वाटते. सेवा काळात सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेले प्रेम, सहकार्य यामुळे सेवानिवृत्तीच्यावेळी कर्मचारी भारावून जातात. विद्यापीठाचा प्रत्येकच कर्मचारी हा ताणतणावाला दूर करुन आपल्या कार्याला वाहून घेणारा आहे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. प्रशांत शिंग्वेकर, श्री जी.के. जनवार, श्री के.बी. पाटील, श्री डब्ल्यू. एन. चोपडे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तर सौ. शिंग्वेकर व सौ. जनवार यांचा सौ. मिनल मालधुरे, सौ. पाटील व सौ. चोपडे यांचा सौ. मोनाली तोटे पाटील यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देवून सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. विद्या शर्मा म्हणाल्या, सेवानिवृत्ती हा आयुष्यातील मोलाचा क्षण असतो आणि कर्मचा-यांच्या भावना देखील त्यांच्या सेवेशी जुळलेल्या असतात. असे असले तरी कामापासून निवृत्ती नाही. कर्मचा-यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याचे त्यांच्या कौतुकावरुनच दिसून येते, असे सांगून त्यांनी सर्व सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. प्रशांत शिंग्वेकर, श्री जी.के. जनवार, श्री के.बी. पाटील, श्री डब्ल्यू. एन. चोपडे यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या प्रेम, स्नेहभावाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच डॉ. नितीन कोळी, डॉ. ए.बी. नाईक, डॉ. एन.व्ही. फिरके, सौ. मिनल मालधुरे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले, संचालक श्री प्रवीण पडोळे यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार भांडार विभागाचे अधीक्षक डॉ. धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



