गो. से. महाविद्यालयाच्या कु. धनश्री मिश्रा यांची “दिल्ली वॉरियर” म्हणून निवड

खामगाव : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी हिताच्या दृष्टीने चालविला जाणारा करिअर कट्टा हा उपक्रम. ह्या उपक्रमांतर्गत 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान “नजरेसमोर राष्ट्र व हृदयात महाराष्ट्र” हा उपक्रम चालविला जातो. ह्या उपक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामधून विद्यार्थ्यांची निवड करून दहा विद्यार्थ्यांची टीम दिल्ली वॉरियर म्हणून दिल्ली येथे पाठविले जाते. यावर्षी अमरावती विभागामधून गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव ची विद्यार्थिनी कु. धनश्री मिश्रा व राजर्षी शाहू महाविद्यालय चांदूर येथील कुमारी सानिया शेख ह्या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. दिल्ली येथे सुमारे 30 ते 35 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांचे शब्दांकन संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, मुलाखत तंत्र, संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य इत्यादी आवश्यक गुण विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याद्वारे वाढीस लागावे व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून सदर उपक्रम राबविला जातो. या उपक्रमामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र मधून ज्यांनी यूपीएससी सारख्या परीक्षा यशस्वीपणे पास करून प्रशासनामध्ये आपली वेगळी छाप उमटविली आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. याकरिता विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण व्यवस्था करिअर कट्टा द्वारे मोफत केली जाते. यामध्ये गो. से. महाविद्यालयाचा सतत सक्रिय सहभाग असतो. याही वर्षी गो. से. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला सदर संधी मिळणे हे महाविद्यालयाकरिता भूषणावर बाब आहे. सर्व स्तरातून कु. धनश्री मिश्रा व सानिया शेख हिचे अभिनंदन केल्या जात आहे. सत्र 2025-026 करिता गो. से. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर हे राज्यस्तरीय करिअर संसद समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे द्वारे राजर्षी शाहू महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील कु. सानिया शेख व गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. धनश्री मिश्रा यांच्या नावाची शिफारस नजरेसमोर राष्ट्र व हृदयात महाराष्ट्र या उपक्रमाकरिता अमरावती विभागामधून करण्यात आली होती. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



