विभागीय आयुक्तालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन

अमरावती, 26 नोव्हेंबर 2025
संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा संविधान दिन आज विभागीय आयुक्तालयात उत्साहात पार पडला. सकाळी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
कार्यक्रमाला अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त रविंद्र हजारे, संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने स्वीकारलेल्या संविधानाला आज 76 वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून दिली. भारतीय संविधानातील मूल्ये, हक्क-अधिकार, तसेच विविध कलमांविषयी सामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान योगदानाला त्यांनी आदरपूर्वक उजाळा दिला.
संविधान दिनाचा हा कार्यक्रम विभागीय आयुक्तालयात राष्ट्रीय भावना आणि संविधानिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.



