संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

जनसंपर्क विभाग
धम्मचक्र प्रवर्तनामुळेच माणूस आज ताठ मानेने उभा आहे – डॉ. राहुल दखने
विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राची व्याख्यानमाला
अमरावती (दि.06.11.2025)-
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही देशातील स्थिती बदलली आहे असे म्हणता येत नाही. मात्र धम्मचक्र प्रवर्तनामुळेच आज माणूस ताठ मानेने उभा आहे, असे प्रखर विचार शिवरामजी मोघे महाविद्यालय, पांढरकवडा येथील इतिहास विभागाचे डॉ. राहुल दखने यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित ‘धम्मचक्र प्रवर्तनाची वर्तमान काळातील प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
डॉ. दखने विषयाची मांडणी करतांना म्हणाले, वैदिक काळात यज्ञपध्दती सर्वदूर पोहचली होती. अशाही काळात बुध्दाने समतेचा विचार मांडला. आत्मा आणि इ·ाराचे अस्तित्व बुध्दाने नाकारले. सारनाथ येथे बुध्दाचे पहिले प्रवचन झाले. बुध्दाचे चरित्र वाचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुध्दाच्या धम्माचे आकर्षण वाढले. त्यांनी लिहिलेल्या लेखामध्येही बुध्दाच्या धम्माचा उल्लेख आढळतो. भारतीय संविधान देखील बुध्दाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय या धम्म तत्त्वज्ञानावर आधारित आहे. माणसाला माणूसपण, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता देणारा धम्म डॉ. बाबासाहेबांना पाहिजे होता व बुध्दाच्या धम्मात या सर्व बाबी त्यांना दिसल्या, त्यामुळे त्यांनी बुध्दाच्या धम्माचा स्वीकार केला, असेही ते म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ. रविंद्र कडू म्हणाले, सर्व धर्माचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दाचा धम्म स्वीकारला. समता, बंधुता, न्याय यावर आधारित बुध्दाचा धम्म आहे. सारनाथ येथे बुध्दांनी पहिल्यांदा दीक्षा दिली आणि तेथूनच प्रवर्तनाची सुरुवात झाली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, दीक्षाभूमी हे देशवासियांचे श्रध्दास्थान आहे. दीक्षाभूमी ही निवासस्थानापासून जवळच असल्याने लहानपणापासूनच दीक्षाभूमीविषयी बाळकडू मिळाले. वर्तमान काळाची स्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय योग्यच होता व त्याची प्रासंगिकताही जाणवते. परंतु डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले काय? हे देखील पहावे लागेल. अनुयायांनी जातीअंताची लढाई पुढे न्यावी. विशेषत: जे उद्याचे भविष्य आहेत, त्या विद्यार्थी वर्गाने प्रकर्षाने ही जबाबादारी पार पाडली पाहिजे, असेही कुलगुरू म्हणाले.
संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, मेणबत्ती प्रज्वलित करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बौध्द धम्म प्रचार समिती, भीमटेकडीच्या वतीने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड यांनी, सूत्रसंचालन डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी, तर आभार श्री सुरज मंडे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



