दिग्रसमध्ये शेतकऱ्यांची चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी

दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप कोसळला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलं आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, उडीद — सर्व पिकांचं अतोनात नुकसान झालं. अशा परिस्थितीत शासनाने दिलासा देण्याऐवजी शांतता पाळल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही त्यांच्या घरात काळोख आहे. या परिस्थितीविरोधात शेतकऱ्यांनी दिग्रस तहसील कार्यालयासमोर बसून शासनाचा निषेध केला. भाकर-चटणी खाऊन त्यांनी शासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध नोंदवला. ‘शेतकऱ्यांच्या जिवावर दिवाळी साजरी करू नका’, ‘शासन जागं व्हा’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या आंदोलनात खासदार संजय देशमुख स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून भाकर-चटणी खाल्ली आणि शासनावर टीकास्त्र सोडलं. अतिवृष्टीबाबतचा शासन निर्णय म्हणजे केवळ दिखावा असल्याचं म्हणत त्या जीआरची होळी करण्यात आली आणि शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आता तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करत आहेत.
अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.



