नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी केले ५२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

नागपूर – नागपूर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंग वाचनालयाजवळ, घाडगेटाका तुळशीबाग रोड परिसरात १९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० ते ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. एनडीपीएस पथकाने गस्तीदरम्यान संशयित हालचाल करणाऱ्या युवकाला थांबवून त्याची झडती घेतली.
यावेळी आरोपीकडून तब्बल ५२ ग्रॅम एमडी मेफेड्रोन पावडर, एक मोबाईल असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी संकेत राजेंद्र भेदे (वय २१, रा. शिंगाडा मार्केट, नागपूर) याला अटक केली आहे. अटक आरोपीवर याआधीही आर्म्स अॅक्टअंतर्गत ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या कारवाईत आणखी दोन आरोपी गंगा उर्फ शिवम उर्फ प्रज्वल काकडे आणि अंकुश उर्फ चिवडा भोसले हे पाहिजे आरोपी असून त्यांच्यावर हत्या, दरोडा, शस्त्रास्त्र कायदा, जुगार, दारूबंदी व NDPS कायद्याखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. ही संपूर्ण कारवाई कोतवाली पोलिस ठाणे यांच्या मदतीने एनडीपीएस पथकाने केली असून पुढील तपास कोतवाली पोलिसांकडे सुरू आहे.



